उघड्यावर सडत शासकीय धान्य; कोरची खरेदी केंद्रातील ढिसाळ व्यवस्थापन उघड

60

उघड्यावर सडत शासकीय धान्य; कोरची खरेदी केंद्रातील ढिसाळ व्यवस्थापन उघड
The गडविश्व
ता. प्र/कोरची, दि.१७ : आदिवासी विविध कार्यकारी संस्था खरेदी केंद्र, कोरची येथे साठवून ठेवलेल्या शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आधारभूत खरेदी योजना हंगाम २०२४–२५ अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धान्याची वेळेत उचल न झाल्याने ते दीर्घकाळ उघड्यावर पडून असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर धान्य योग्य साठवण व्यवस्थेविना उघड्यावर ठेवण्यात आले होते. धान्यावर ताडपत्री देखील झाकण्यात न आल्याने पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात धान्य ओलावून खराब झाले आहे. सध्या त्या धान्यातून तीव्र दुर्गंधी येत असून, शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
एकीकडे अनेक कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण होत असताना, दुसरीकडे शासकीय खरेदीतील धान्य उघड्यावर सडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या संदर्भात खरेदी केंद्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, यापूर्वी या प्रकरणी एका कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच आधारभूत खरेदी योजना हंगाम २०२४–२५ मधील धान्याची वेळेत उचल न झाल्यामुळे आणि पावसामुळे काही धान्य खराब झाल्याचे त्यांनी मान्य केले. खराब झालेल्या धान्याबाबत लवकरच लिलाव प्रक्रिया राबवून त्याची विक्री करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
— गणेश सावळे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, कोरची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here