गडचिरोली : भरधाव कारचा थरारक अपघात, हवेत झेप घेत पलटी
– चालक जखमी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : शहरातील चंद्रपूर मार्गावरील कारगील चौकात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव चारचाकी वाहनाचा थरारक अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या कारने कठडे तोडत हवेत झेप घेत रस्त्याच्या मध्यभागी पलटी घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात चालक जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार, देव राहुल महात्मे (२२) हा युवक आपल्या कारने चंद्रपूर मार्गावरून गडचिरोली शहराकडे येत होता. वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. कारने प्रथम रस्त्याच्या डाव्या बाजूचे कठडे तोडले आणि पुढे दोन लोखंडी दिशादर्शक फलकांना जबर धडक दिली. धडकेनंतर कार सुमारे १०० फूट अंतर हवेत उसळून कारगील स्मारकाजवळ उलटली.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत उलटलेल्या वाहनातून जखमी चालकाला बाहेर काढून त्याला तातडीने मदत केली. विशेष म्हणजे, वाहनात चालक एकटाच असल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच रामनवमीच्या निमित्ताने त्या वेळी रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने आणखी गंभीर दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, कारगील चौकात अल्पावधीत झालेली ही दुसरी मोठी अपघाताची घटना असून, या ठिकाणच्या वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी युवकाला रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













