गडचिरोली : स्कॉर्पिओमधून अवैध दारूची तस्करी, ११ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

103

गडचिरोली : स्कॉर्पिओमधून अवैध दारूची तस्करी, ११ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
-एक आरोपी अटकेत; दोन साथीदार फरार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैध मद्याची वाहतूक करून ग्रामीण भागातील चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला. पेंढरी परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष कारवाईत देशी-विदेशी मद्याचा मोठा साठा आणि स्कॉर्पिओ वाहनासह ११ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध दारूविक्री व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बेडगाव (ता. कोरची) येथील लखन जोहारी भैसा(४०) हा आपल्या साथीदारांसह स्कॉर्पिओ वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य घेऊन मंगेवाडा मार्गे पेंढरी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगेवाडा-पेंढरी मार्गावर सापळा रचला. दरम्यान, संशयित स्कॉर्पिओ वाहन येताच पोलिसांनी ते अडविण्याचा प्रयत्न केला. वाहन थांबताच चालकाच्या बाजूला बसलेले दोन जण अंधाराचा व शेतशिवाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. मात्र वाहन चालक लखन भैसा याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध ब्रँडच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की, माऊंट ६००० बिअर, लेमाऊंट बिअर, मॅकडॉवेल्स नंबर वन व्हिस्की तसेच गोवा व्हिस्कीचा समावेश आहे. मद्यसाठ्याची किंमत सुमारे ४ लाख रुपयांपेक्षा अधिक असून, स्कॉर्पिओ वाहनासह एकूण जप्ती ११ लाख ५ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
या प्रकरणी उपपोस्टे पेंढरी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लखन जोहारी भैसा याच्यासह निर्मल धमगाये व तरुण धमगाये या दोघांविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here