वनगुन्हा दाबण्यासाठी ३ लाखांच्या लाचेची मागणी ; वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक आणि खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : वनगुन्ह्याची कारवाई दाबून फर्निचर विक्री परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठविण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक आणि एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध ११ जून २०२६ रोजी अवैध सागवान लाकूड बाळगल्याप्रकरणी पेड्डीगुडम वनपरिक्षेत्रांतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदाराकडे असलेले फर्निचर विक्रीचे परवाना (लायसन्स) रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास मदनय्या कटकू यांच्या वतीने वनरक्षक नितेश पांडुरंग मडावी यांनी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कटकू यांनी स्वतःसाठी तीन लाख रुपयांची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये खासगी इसम प्रदीप गणेश मंडल याच्याकडे देण्यास सांगितले. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला.
१९ जून रोजी मुलचेरा-गणेशपूर मार्गावर प्रदीप मंडल हा तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. चौकशीत या लाच प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू व वनरक्षक नितेश मडावी यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) अंतर्गत कलम ७, ७(अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईचे सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक विकांत सगणे यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक किरण बगाटे हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे मुलचेरा परिसरातील वनविभागात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरोधातील एसीबीच्या धडक मोहिमेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews













