९५ विद्यार्थ्यांचे भविष्य दोन शिक्षकांच्या भरोशावर ; कोसमीत शाळा बहिष्काराचा इशारा
– चार शिक्षकांची पदे रिक्त, शिक्षक नियुक्ती होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा ग्रामसभेचा निर्णय
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १७ : धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, कोसमी नं. १ येथे शिक्षकांच्या तीव्र कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊनही आवश्यक शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने संतप्त पालकांनी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
कोसमी नं. १ येथील शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण ९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्येनुसार या शाळेत किमान सहा शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यामध्ये प्राथमिक विभागासाठी दोन शिक्षक, माध्यमिक विभागासाठी तीन विषय शिक्षक आणि एक मुख्याध्यापक अपेक्षित आहे. मात्र, सध्या शाळेत केवळ दोनच शिक्षक कार्यरत असून चार पदे रिक्त असल्याने संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
मागील शैक्षणिक वर्षातही शिक्षकांची कमतरता होती. याबाबत ग्रामसभा व शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तथापि, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.
अवघ्या दोन शिक्षकांवर आठ वर्गांचा अध्यापनाचा भार पडत असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे कठीण झाले आहे. त्यातच विविध शासकीय उपक्रमांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कामांचा ताण असल्याने शिक्षकांची मोठी दमछाक होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर प्रश्नावर १० जून रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत पालकांनी एकमुखी निर्णय घेतला. शाळेत आवश्यक शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात येणार नाही, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. तसेच या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान शासन व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होणार असल्याने त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
यासंदर्भातील निवेदन ग्रामसभा अध्यक्ष गजेंद्र बुधाराम नैताम, सचिव रविंद्र रामासिंग मडावी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार मारगोनवार यांनी १६ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना सादर केले आहे. शिक्षकांची तातडीने नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.













