धानोरा-मुरुमगाव रस्त्याची चाळण; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १७ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० अंतर्गत धानोरा-मुरुमगाव मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, या प्रश्नावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. निर्धारित मुदतीत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेंनगुरे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा शेवंता हलामी, रंजना शिडाम व सचिन गावतुरे यांच्या स्वाक्षरीने धानोरा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
धानोरा ते ढवळी दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना तालुका मुख्यालय गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, गर्भवती माता, रुग्ण तसेच शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक वाहने खड्ड्यांमध्ये अडकत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून, बससेवाही प्रभावित होत आहे. संबंधित विभागांना वारंवार सूचना देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात आता काँग्रेसने संघर्षाची भूमिका घेतली असून, येत्या पाच दिवसांत महामार्गाची डागडुजी व दुरुस्ती न झाल्यास शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असेही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.













