जनसंवादातून सुशासनाकडे’ : तंत्रज्ञानातून प्रशासन गतिमान करण्याचा जिल्हाधिकारी यांचा अभिनव उपक्रम

568

– दुर्गम भागातील नागरिकांना दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट मांडता येतील समस्या
The गडविश्व
गडचिरोली दि. १२ : नागरिकांचा सर्वांगिण विकास हा निर्णय प्रक्रीयेत त्यांच्या सहभागातूनच शक्य आहे, त्यासाठी प्रशासन व जनतेमध्ये नियमित संवाद असणे गरज आहे. मात्र प्रशासकीय निर्णय घेणाऱ्या जिल्हा अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी विशेषत: जिल्ह्यातील दुर्गम, नक्षलग्रस्त व दळणवळनाची अपुरी साधने असलेल्या भागात प्रत्यक्ष जाणे शक्य होत नाही तसेच संबंधीत नागरिकांचाही जिल्हास्तरावर संपर्क होत नाही. या बाबीवर लक्ष केंद्रीत करून नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणने, त्याचे तात्काळ निराकरण करणे व निर्णय प्रक्रीयेत त्यानुसार सुधारणा करण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाद्वारे ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरचा उपयोग करून दूरदृष्य प्रणालीद्वारे दुर्गम भागात जनसंवाद साधण्यात येणार आहे. शासनाच्या योजना ग्रामस्थापर्यंत पोहचल्या की नाही, त्यांच्या अडचणी, मागण्या व तक्रारी काय आहेत हे जाणून संबंधीत अंमलबजावणी अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोडविण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे.
पथदर्शी पकल्प म्हणून १३ जून रोजी दुपारी १२ वाजता पहिला जनसंवादाचा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात अहेरी तालुक्यातील रेगुलवाही व येनकाबंडा, भामरागड तालुक्यातून हिंदेवाडा (म) व कारमपल्ली, एटापल्ली तालुक्यातून कमके अलायस घोटसूर व कोईनदुळ या सहा दुर्गम गावातील नागरिकांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी विजय भाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल तसेच सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संबंधीत गावात स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार स्थानिक गावकरी ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये जमा होवून व्ही.सी.द्वारे बैठकीत सामिल होतील. यासोबतच संबंधीत गावचे ग्राम पंचायत सचिव, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, वैद्यकीय अधिकारी, कृषी सेवक, शाळेचे मुख्याध्यापक, समुह संसाधन व्यक्ती, रेशन दुकानदार, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती सदस्य, तालुकास्तरावरून तहसिलदार, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अभियंता तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी या बैठकीत सामील होतील व संबंधीत ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने उत्तरे देवून त्या सोडवतील.
जिल्हा प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करून जनसंवादातून सुशासनाकडे या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolicollector )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here