– मागील १५ दिवसात दोन वनपालांवर कारवाईने खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : जिल्ह्यातील आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय मध्ये कार्यरत असलेल्या वनपाल मारोती गायकवाड, श्रीमती ममता नामदेव राठोड, वनपरीक्षेत्र अधिकारी, आलापल्ली, गणेश उत्तम राठोड, वनरक्षक, फिरते वनसंरक्षक पथक, आलापल्ली यांनी घरकुल कामाकरीता आवश्यक असलेल्या विटा तयार करण्यासाठी माती वाहतूक करणाऱ्या कडून १ लाख १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई शनिवार ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या घटनेने वन विभागात खळबळ उडाली असून गेल्या १५ दिवसात जिल्ह्यातील दोन वनपालांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आलापल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या आपापल्ली उपक्षेत्रातील तानबोडी बिटातून तक्रारदार हा ६ फेब्रुवारी रोजी घरकुल बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या विटा तयार करण्यासाठी माती वाहतूक करत होता. दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी वनपाल मारोती गायकवाड आणि वन मजुरांनी ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टर सोडण्यासाठी वनपाल गायकवाड याने १ लाख १० हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी तक्रारदार याकडे केली असता तडजोडीअंती १ लाख देण्याचे ठरले. तक्रारदार याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे यापूर्वीच तक्रार दाखल केली होती. दरम्यान शनिवारी सापळा कारवाईमध्ये वनपाल मारोती गायकवाड,श्रीमती ममता नामदेव राठोड, वनपरीक्षेत्र अधिकारी, आलापल्ली, आलोसे गणेश उत्तम राठोड, वनरक्षक, फिरते वनसंरक्षक पथक, आलापल्ली यांना ८३ हजार रुपयांची लाच स्विकारताना आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
मागील १५ दिवसात जिल्ह्यातील दोन वनपालांवर लाचुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात आहे त्यावर महसूल विभाग, वन विभाग कारवाई करतांना दिसत आहे मात्र तरीही काही मुजोर रेती तस्कर हे त्यांना न जुमानता रात्रीस रेतीची वाहतूक करून शासनाच्या गौणखनिजांची लूट करतांना दिसत आहेत. अशातच महसूल विभाग, वनविभागाने कारवाई करित असताना रेती तस्कर तडजोड करून कारवाई न करण्याची मागणी करीत असल्याचेही बोलल्या जात आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #gadchiroliforest #acbtrapd )