ब्रह्मपुरीत पानटपरीवर एफडीएची धडक कारवाई; प्रतिबंधित खर्रा, सुगंधी तंबाखूसह मशीन जप्त

72

ब्रह्मपुरीत पानटपरीवर एफडीएची धडक कारवाई; प्रतिबंधित खर्रा, सुगंधी तंबाखूसह मशीन जप्त
The गडविश्व
ब्रह्मपुरी, दि. ०३ : शहरातील एका पानटपरीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई करत प्रतिबंधित खर्रा, सुगंधी तंबाखू तसेच त्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे मशीन जप्त केले. या कारवाईत ३३ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित दुकानदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २ जुलै रोजी ब्रह्मपुरी येथील धनेश पान सेंटर, टी स्टॉल ॲण्ड कोल्डड्रिंक सेंटर येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला खर्रा, सुगंधी तंबाखू तसेच त्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे मशीन साठवून विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
कारवाईदरम्यान धनेश रंजन राखडे यांच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि मशीन जप्त करण्यात आले. जप्त साहित्याची एकूण किंमत ३३ हजार ४५ रुपये असून, प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा व विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी मेघा एन. फाळके यांनी उमेश कापगते, कुणाल मुळे आणि प्रणय कांबळे यांच्या सहकार्याने केली. जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #chandrpurnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here