पुन्हा वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

1404

– पत्नीने वाघाला परतवून लावले, परिसरात दहशत कायम
The गडविश्व
ता.प्र / सावली , १० जानेवारी : तालुक्यात नुकताच एका वाघाला जेरबंद करण्यात आल्यानंतर आणखी वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना. केरोडा मोखाळा परिसरात स्वतःच्या शेतात कापूस वेचत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना मंगळवार १० जानेवारी रोजी दुपारी ०४:०० वाजताच्या सुमारास घडली. मनोज शालिक कुमरे (३७) रा. केरोडा असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मनोज शालिक कुमरे हे स्वतःच्या शेतामध्ये कापूस वेचन्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला, यावेळी जवळच असलेल्या पत्नीने आरडा ओरड करून काठी घेऊन धाव घेऊन वाघाला परतवून लावले. मात्र या झटापटीत मनोज जखमी झाले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्याला उपचाराकरिता गडचिरोली सामान्य रुग्णालय दाखल केल्याची माहिती आहे.
परिसरात मागील काही दिवसांपासून नरभक्षक वाघाची दहशत असून. काही दिवसांपूर्वी केरोडा येथे वाघाने शेळी फस्त केली होती. दरम्यान एका वाघाला जेरबंद सुद्धा वनविभागाच्या वतीने करण्यात आले होते. वाघाला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असतांनाच आता पुन्हा वाघाने इसमावर हल्ला केल्याने जेरबंद करण्यात आलेला वाघ हा नेमका तोच हल्लेखोर वाघ आहे की दहशत माजवणारा वाघ अद्यापही मोकाटच आहे असा सवाल परिसरातील नागरिक करीत असून परिसरात दहशत कायम आहे. दहशत माजवणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

(The Gadvishva) (Chandrapur Gadchiroli News) ( Tiger Attack) (Keroda) (Saoli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here