हत्ती पाहण्याचा मोह ठरला जीवघेणा ; गडचिरोलीत टस्करच्या हल्ल्यात इसम ठार

2

हत्ती पाहण्याचा मोह ठरला जीवघेणा ; गडचिरोलीत टस्करच्या हल्ल्यात इसम ठार
– वनविभागाच्या वारंवार इशाऱ्यांकडे दुर्लक्ष
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : जिल्हा मुख्यालयालगतच्या चांदाळा जंगल परिसरात टस्कर हत्ती पाहण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (८ जुलै) सायंकाळी घडली. वनविभागाने हत्तीच्या परिसरात जाऊ नये, तसेच फोटो किंवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये, अशा वारंवार सूचना दिल्या असतानाही त्या धाब्यावर बसविल्याने ही दुर्घटना घडली.
या घटनेत धनराज पुंजीराम मडावी (रा. मेंढा, चांदाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींसमोरच हत्तीने केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातून आलेला टस्कर हत्ती सध्या चांदाळा जंगल परिसरात वावरत आहे. हत्ती पाहण्यासाठी आणि मोबाईलवर छायाचित्रे तसेच सेल्फी घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जंगल परिसरात जमा झाले होते. याचवेळी टस्कर हत्तीने अचानक धाव घेत हल्ला चढवला. या हल्ल्यात धनराज मडावी यांना हत्तीने चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, याच टस्कर हत्तीने यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड–सोनापूर मार्गावर एका व्यक्तीचा बळी घेतला होता. त्यानंतरही नागरिकांकडून हत्तीच्या जवळ जाण्याचे प्रकार सुरूच असल्याने वनविभागाची चिंता वाढली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, रानटी हत्ती किंवा इतर वन्यप्राण्यांच्या जवळ जाणे, त्यांचे फोटो अथवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणे धोकादायक असून नागरिकांनी अशा प्रकारचा मोह टाळावा, असे आवाहन वनविभागाने पुन्हा एकदा केले आहे. वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, त्यांना कोणत्याही परिस्थितीत चिथावणी देऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #ElephantAttack #Tusker #WildElephant #HumanWildlifeConflict #BreakingNews #Maharashtra #ForestDepartment #WildlifeSafety #StaySafe #WildlifeAlert #Elephant #IndiaNews #AccidentNews #PublicSafety #ForestNews #GadchiroliNews #TrendingNews #NewsUpdate #TheGadVishwa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here