पुनर्वसनाच्या वाटेवर मोठे पाऊल ; आत्मसमर्पित तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिका
– राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे होणार सुलभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरणांतर्गत सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. महसूल प्रशासनाने आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम आणि मदनी गणपत तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण केले. त्यामुळे या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.
अहेरी तहसील कार्यालयात बुधवारी (८ जुलै) तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव तसेच महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम या पूर्वी नक्षल चळवळीतील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी १ जानेवारी २०२५ रोजी, तर त्यांचे पती सोनू उर्फ भूपती यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.
शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणानुसार आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देत त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शिधापत्रिका उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त धान्याबरोबरच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी अशा उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे प्रशासनाने सांगितले.













