दंडकारण्य पतसंस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे

12

दंडकारण्य पतसंस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे
– प्राचार्य डॉ. वंदनाताई मुनघाटे यांचे प्रतिपादन, ३१ वी आमसभा उत्साहात
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.२९ : दंडकारण्य पतसंस्थेच्या स्थापनेचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. ही प्रगती पाहताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय गो. ना. मुनघाटे साहेब यांना निश्चितच आनंद झाला असता. पतसंस्थेच्या पुढील प्रगतीसाठी सभासदांसह सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वंदनाताई मुनघाटे यांनी केले.
दंडकारण्य पतसंस्थेची ३१ वी आमसभा गडचिरोली येथील विद्याभारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे ज्येष्ठ सदस्य नामदेवराव बानबले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्राचार्य डॉ. वंदनाताई मुनघाटे, प्राचार्य सुमाताई लडके, पतसंस्थेचे अध्यक्ष यादवराव बानबले, उपाध्यक्ष प्रा. गोरटेकर, सचिव सतीशराव मुनघाटे, सदस्य डॉ. संजय महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थी अर्णव रवींद्र विखार, श्रेया योगेश्वर गेडाम, वेदांत रेमाजी चुधरी आणि गीतांजली संजय चुधरी तसेच सेवानिवृत्त सभासद अशोक काचीनवार, प्रा. वाढनकर, देशमुख, रत्नाकर वासेकर, प्रा. उईके, प्रकाश चुधरी, विनायक मुनघाटे, पांडुरंग उईके, मांडवे आदींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. मुनघाटे म्हणाल्या की, १९९५ मध्ये श्रद्धेय गो. ना. मुनघाटे साहेबांनी दंडकारण्य पतसंस्थेचे रोपटे रोवले. या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सभासदांनी कर्ज घेऊन आपल्या गरजा पूर्ण केल्या आहेत. कोणत्याही पतसंस्थेची प्रगती ही तिच्या सभासदांवर अवलंबून असते. सभासदांना कर्ज मिळणे सुलभ व्हावे यासाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता ठेवण्याचा प्रयत्न करावा. अधिकाधिक सभासदांनी कर्जाचा लाभ घेतला आणि कर्जाची नियमित परतफेड केली, तर पतसंस्थेची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य सुमाताई लडके यांनी गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार ही कौतुकास्पद परंपरा असल्याचे सांगितले. सभेचे अध्यक्ष नामदेवराव बानबले यांनीही सेवानिवृत्त सभासदांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आमसभेचे प्रास्ताविक अध्यक्ष यादवराव बानबले यांनी केले. संचालन डॉ. संजय महाजन यांनी, तर आभार धनंजय चुधरी यांनी मानले. आमसभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here