कुरखेड्यात शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान; जनजागृती रॅलीतून सामाजिक संदेश
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.२९ : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा परिसराची स्वच्छता केली.
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक उमेश जंगावार, सहाय्यक अधीसेविका पुष्पलता खवळ, अधीपरिचारिका बारूला ओडींगवार, कनिष्ठ लिपिक डी. बी. सारोटे, आरोग्यमित्र दीक्षा जोगे आणि शिपाई हेमराज हुंडरा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसरातील कचरा व अस्वच्छता दूर केली.
यावेळी स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारी आणि नागरिकांचे कर्तव्य याबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅलीही काढण्यात आली. घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छता व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. संघमित्रा कांबळे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सेवाभाव रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.













