‘व्होटचोरी’च्या आरोपाआधी आत्मपरीक्षण करा ; डॉ. अशोक नेते यांचा राहुल गांधींवर निशाणा

12

‘व्होटचोरी’च्या आरोपाआधी आत्मपरीक्षण करा ; डॉ. अशोक नेते यांचा राहुल गांधींवर निशाणा
– तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या आरोपांवर सवाल
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : तीनही निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभा केलेला ‘फेक नॅरेटिव्ह’ उघड झाल्याचा दावा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी केला. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियांबाबत प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असेही त्यांनी म्हटले.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. नेते यांनी राहुल गांधी यांच्यावर संवैधानिक संस्थांबाबत जनतेमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा आरोप केला. “संविधान हातात घेऊन त्याच संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली. संविधानाने दिलेली लोकशाही व्यवस्था आणि संवैधानिक संस्थांवरील विश्वास अबाधित राहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

SIR प्रक्रियेबाबत कोणताही मतभेद नाही

विशेष पुनरिक्षण प्रक्रियेसह (SIR) निवडणूक आयोगातील सर्व प्रक्रिया एकमताने झाल्या असून आयुक्तांमध्ये कोणताही ‘डिफरन्स ऑफ ओपिनियन’ नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आल्याचा दावा डॉ. नेते यांनी केला. कॅबिनेट सेक्रेटरींकडे पाठविण्यात आलेले पत्र हे कोणत्याही धोरणात्मक विषयाशी संबंधित नसून डेप्युटेशनवरील नियुक्तीशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फॉर्म क्रमांक ६ बाबतही जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविलेल्या स्वरूपातच फॉर्म क्रमांक ६ वापरला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘विजय मिळाला की आयोग योग्य, पराभव झाला की आरोप का?’

कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाबाबत आक्षेप घेतला गेला नाही. मात्र भाजपला विजय मिळाल्यानंतर आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचा दावा करत डॉ. नेते यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.
ईव्हीएमच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान दिल्यानंतरही आरोप सुरूच असल्याचे ते म्हणाले. “व्होटचोरीचा आरोप करण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

SIRमुळे मतदार याद्या अधिक अचूक करण्याची संधी

पश्चिम बंगालमधील ज्या १५ मतदारसंघांमध्ये SIR प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या कमी झाल्याचा दावा केला जात आहे, त्या मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याचा संदर्भ देत डॉ. नेते यांनी काँग्रेसच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केला.
२००४ मध्येही SIR प्रक्रिया झाल्याचे सांगत मतदार याद्या नियमितपणे अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः शहरी भागात स्थलांतरामुळे मतदार याद्यांमध्ये बदल होतात. अनेक नागरिकांचे नाव गावासह शहरातील मतदार यादीत राहण्याची शक्यता असल्याने अशा नोंदींची पडताळणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार याद्या अधिक अचूक करण्याच्या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याची संधी आहे. त्यामुळे संवैधानिक संस्थांवर आरोप करण्याऐवजी उपलब्ध प्रक्रियेत सहभागी होऊन मतदार याद्या शुद्ध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. नेते यांनी केले.
भारताचे संविधान आणि संविधानाने निर्माण केलेल्या संवैधानिक संस्था अबाधित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here