– देसाईगंज वनविभागाचा वन्यजीव सप्ताहात अभिनव उपक्रम
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि. ०५ : महाराष्ट्रभर १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान साजरा होत असलेल्या वन्यजीव सप्ताहा निमित्त देसाईगंज वनविभागाने एक आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविला आहे. तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरातील नाल्यावर टाकावू वस्तूंचा वापर करून वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील वन्यजीवांना पाण्याचा स्थायी स्रोत उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळाली आहे.
कोंढाळा परिसर वाघांसह विविध वन्यजीवांच्या वास्तव्याने समृद्ध आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे व भूजलपातळी घटल्याने जंगल परिसरात पाण्याची टंचाई जाणवत होती. यामुळे प्राणी गावांच्या दिशेने भटकंती करत असल्याचे आढळत होते. या पार्श्वभूमीवर देसाईगंज वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक संदीप शेंडे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत पदाधिकारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहभागातून या अभिनव बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.
टाकावू वस्तूंचा पुनर्वापर करून आणि मातीच्या साहाय्याने तब्बल तीन तासांच्या श्रमांत १८ फूट लांब व ४ फूट रुंद असा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नाल्यातील पाणी थांबून जमिनीत मुरण्यास मदत होईल, परिणामी परिसरातील हिरवाई वाढेल व वन्यजीवांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होईल.
या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच अपर्णा राऊत, क्षेत्र सहाय्यक संदीप शेंडे, कैलास राणे (उपाध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती), शेषराव नागमोती, संदीप वाघाडे, भूमेश्वरी गुरनुळे, निलिमा सेलोटे, निलेश पंधराम, मिथुन अहिर, मयुरी कळमकर, सुरेश रामटेके, अरुण दुपारे, दिलीप भुते आणि ओमकार चौधरी आदींचा सक्रिय सहभाग होता.
देसाईगंज वनविभागाचा हा उपक्रम केवळ पाणी संवर्धनाचे उदाहरण नसून, टाकावू वस्तूंच्या पुनर्वापरातून पर्यावरणपूरक उपाययोजनांची दिशा दाखवणारा आदर्श ठरला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews Desaignaj Forest Department, Wildlife Week, Eco-Friendly Project, Kondhala Forest, Water Conservation, Vanarai Bandhara













