शॉर्टकटच्या नादात ‘रॉंग साइड’ नको; गडचिरोली पोलिसांचे ‘ऑपरेशन यू-टर्न’

14

शॉर्टकटच्या नादात ‘रॉंग साइड’ नको; गडचिरोली पोलिसांचे ‘ऑपरेशन यू-टर्न’
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : शहरातील वाढती वाहतूक आणि नियमभंगामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी गडचिरोली शहर वाहतूक विभागाने ‘ऑपरेशन यू-टर्न’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. निर्धारित यू-टर्नचा वापर न करता विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासोबतच वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती केली जात आहे.
शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही ताण वाढला आहे. विशेषतः वेळ वाचविण्याच्या नादात काही वाहनचालक निर्धारित यू-टर्न टाळून ‘रॉंग साइड’ने वाहन चालवितात. काही मिनिटांचा हा शॉर्टकट समोरून येणाऱ्या वाहनांसाठी धोकादायक ठरून गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकतो.
शहरातील प्रमुख रस्ते आणि महामार्गांवर सुरक्षितपणे दिशा बदलण्यासाठी नियोजित यू-टर्न उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा वापर न करता विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याने वाहतुकीचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होतो. समोरून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागणे किंवा वाहन वळवावे लागणे यामुळे अपघाताचा धोका वाढतो.या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक विभागाकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवून आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर वाहनचालकांना निर्धारित दिशेनेच वाहन चालविणे, नियोजित यू-टर्नचा वापर करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत.
‘शॉर्टकटच्या नादात रॉंग साइड नको; सुरक्षित प्रवासासाठी निर्धारित यू-टर्नच हवा’, असा संदेश वाहतूक विभागाने दिला आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी चालकांनी सुरक्षित वेग राखावा आणि स्वतःसोबतच इतर वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ही मोहीम अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सपोनि. शरद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here