गडचिरोली : आंघोळीसाठी जाताच काळाचा घाला; सर्पदंशाने एसआरपीएफ जवानाचा मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली, ०७ : नक्षलविरोधी अभियानासाठी रेगडी परिसरात तैनात असलेल्या एसआरपीएफ जवानाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. आंघोळीसाठी जात असताना विषारी सापाने दंश केल्यानंतर उपचारादरम्यान या जवानाने अखेरचा श्वास घेतला. राहुल प्रभाकर शिनगारे (३७) असे मृत जवानाचे नाव आहे.
धुळे येथील एसआरपीएफ गट क्रमांक ६ मधील ‘एफ’ कंपनी सुमारे दीड महिन्यापूर्वी नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली होती. शिनगारे यांची चामोर्शी तालुक्यातील रेगडी परिसरात बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी सुमारे ७ वाजता ते कॅम्पमधील हौदाजवळ आंघोळीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या हाताला विषारी सापाने दंश केला. सर्पदंश होताच त्यांनी कॅम्पकडे धाव घेत सहकाऱ्यांना माहिती दिली. जवानांनी तातडीने त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने शिनगारे यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राहुल शिनगारे हे धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ जवान म्हणून सहकाऱ्यांमध्ये परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली.
शासकीय इतमामात शोकसलामी
शिनगारे यांच्या पार्थिवावर गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता शोकसलामी देण्यात आली. यावेळी हवेत तीन फैरी झाडून शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह एसआरपीएफचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि जवान उपस्थित होते.
#thegadvishva #thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #srpf
#Gadchiroli #GadchiroliNews #SRPF #SRPFJawan #SnakeBite #SnakeBiteDeath #PoliceNews #GadchiroliPolice #MaharashtraPolice #AntiNaxalOperation #PoliceForce #RahulShingare #BreakingNews #TheGadvishva













