नांगरणी करताना काळाचा घाला; ट्रॅक्टर नदीत उलटून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

26

नांगरणी करताना काळाचा घाला; ट्रॅक्टर नदीत उलटून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०६ : शेतात नांगरणीचे काम सुरू असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटून तो शेजारील काठानी नदीत उलटला. या भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली दबून शत्रुघ्न सोनुले (४७, रा. धानोरा) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
शत्रुघ्न सोनुले हे भूमिहीन शेतकरी असून भाडेतत्त्वावर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम सुरू होते. सोनुले हे ट्रॅक्टर चालकाच्या बाजूला बसून कामाचे नियोजन सांगत होते. दरम्यान, अचानक चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला.
धोका लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून ट्रॅक्टरवरून उडी मारली. मात्र, सोनुले यांना वेळेत खाली उतरता आले नाही. अनियंत्रित ट्रॅक्टर थेट शेजारील काठानी नदीत जाऊन उलटला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून सोनुले यांचा जागीच मृत्यू झाला.
सोनुले हे मेहनती, मनमिळावू तसेच इतरांच्या मदतीला सदैव धावून जाणारे म्हणून परिचित होते. भूमिहीन असल्याने ते इतरांची शेती भाड्याने घेऊन शेतीची मशागत करत तसेच बाजारात भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सोनुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे धानोरा परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोनुले यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here