कुरखेड्यात विविध शासकीय कार्यालये व शाळांमध्ये पक्ष्यांसाठी ‘पाणी पात्रांचे’ वाटप
– मुक्या जीवांसाठी वनविभागाचा संवेदनशील उपक्रम
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०९ : उन्हाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना मानवांसोबतच पशू-पक्ष्यांनाही पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर कुरखेडा वनपरिक्षेत्र कार्यालय व उपक्षेत्राच्या वतीने मुक्या जीवांची तहान भागविण्यासाठी स्तुत्य पुढाकार घेत विविध शासकीय कार्यालये व शाळांमध्ये पक्ष्यांसाठी मातीची पाणी पात्रे वितरित करण्यात आली.
वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्रोत आटत चालल्याने पक्ष्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी गोपुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. वनविभागाच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाण्याची भांडी सुपूर्द केली.
यामध्ये श्रीराम विद्यालय, विद्या भारती विद्यालय, कुरखेडा पोलीस स्टेशन, न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पंचायत समिती कार्यालयाचा समावेश आहे. यावेळी संबंधित कार्यालय प्रमुखांना दररोज पात्रांमध्ये स्वच्छ पाणी भरून पक्ष्यांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व विभाग प्रमुखांनी वनविभागाच्या कार्याचे कौतुक केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार, वनरक्षक एस. डब्ल्यू. गोन्नाडे (कुरखेडा) आणि एम. के. दुधबळे (वडेगाव) यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच वनमजूर विकी गोबाडे, विवेक गहाणे, डोंगरे, कुमरे, मडावी आणि कोरेटी यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
वनविभागाच्या या संवेदनशील आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनीही आपल्या घराबाहेर पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.














