एटापल्ली येथे सीआरपीएफ कॅम्पसाठी २ हेक्टर जमीन मंजूर
– नक्षलग्रस्त गडचिरोलीतील सुरक्षा व्यवस्थेला मिळणार अधिक बळ
The गडविश्व
मुंबई, दि.८ : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत एटापल्ली येथे सीआरपीएफ कॅम्प उभारण्यासाठी २ हेक्टर शासकीय जमीन मंजूर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
एटापल्ली येथील सर्व्हे क्रमांक १५९/२ मधील एकूण ६.९८ हेक्टर क्षेत्रापैकी २ हेक्टर जमीन सीआरपीएफ कॅम्पसाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांना महसूलमुक्त व सारामाफीने देण्यात येणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ तसेच संबंधित नियमांनुसार ही मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाने या मंजुरीसोबत काही अटीही घातल्या आहेत. सदर जमिनीचा वापर केवळ मंजूर उद्देशासाठीच करता येणार असून शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन विक्री, हस्तांतरण किंवा गहाण ठेवता येणार नाही. तसेच जमीन वनक्षेत्रात नसल्याची खातरजमा करून दोन वर्षांच्या आत बांधकाम सुरू करणे बंधनकारक राहणार आहे.
या निर्णयामुळे एटापल्ली परिसरातील सुरक्षा यंत्रणेला अधिक मजबुती मिळणार असून नक्षलविरोधी कारवायांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.














