अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग ; ११ मे पासून भाग-१ व भाग-२ अर्ज भरण्यास सुरुवात

61

अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग ; ११ मेपासून भाग-१ व भाग-२ अर्ज भरण्यास सुरुवात
– शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला आता वेग आला असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरण्याची सुविधा ११ मे २०२६ पासून उपलब्ध होणार आहे. शिक्षण संचालनालयाने यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान यापूर्वी प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा १० एप्रिल २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली होती. ८ मे २०२६ पर्यंत राज्यभरातील ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी भाग-१ भरून नोंदणी पूर्ण केली आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू होत असून विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचून आपला प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
या प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, ‘ओपन टू ऑल’ चौथी फेरी तसेच मुलींसाठी विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीक्रम, गुण व लागू आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करावयाची आहे. एका विद्यार्थ्याला किमान १ व कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत.

शून्य फेरीचे वेळापत्रक

विद्यार्थ्यांची नोंदणी व अर्जाचा भाग-१ ऑनलाइन सादर करणे ८ ते १० मे दरम्यान होणार आहे. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी ११ ते १३ मे दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीबाबत हरकती किंवा दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांना १४ ते १५ मे दरम्यान लॉगिनमधील ‘Grievance Redressal’ सुविधेद्वारे मागणी सादर करता येईल. त्यानंतर संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्या स्तरावर हरकतींचे निराकरण करून २० मे रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करण्यात येणार आहे.

नियमित कॅप फेरी-१

नियमित कॅप फेरी-१ अंतर्गत नवीन विद्यार्थी नोंदणी, भाग-१ मधील बदल आणि भाग-२ मध्ये पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया २१ मे सकाळी ८ वाजेपासून २२ मे सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील. अलॉटमेंट प्रक्रिया २३ ते २६ मे दरम्यान पूर्ण केली जाणार असून २६ मे रोजी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी, कटऑफ यादी आणि विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये वाटपाचा तपशील प्रदर्शित केला जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी ‘Proceed for Admission’ करून कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चितीची प्रक्रिया २६ ते २८ मे २०२६ दरम्यान होणार आहे. रिक्त जागा २९ मे रोजी प्रदर्शित करण्यात येतील, तर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक ३० मे २०२६ रोजी जाहीर केले जाणार आहे.
विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचना वेळोवेळी पाहाव्यात. अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल https://mahafyjcadmissions.in, ई-मेल support@mahafyjcadmissions.in तसेच हेल्पलाईन क्रमांक ८५३०९५५५६४ उपलब्ध आहे, असे शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here