आरोग्य योजनांमध्ये रुग्णांची लूट करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे ; आरोग्य मंत्र्यांचे कडक आदेश

79

आरोग्य योजनांमध्ये रुग्णांची लूट करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे ; आरोग्य मंत्र्यांचे कडक आदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत रुग्णांकडून अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या किंवा उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या अंगीकृत रुग्णालयांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. या योजनांअंतर्गत मिळणारे उपचार हा सामान्य जनतेचा हक्क असून त्यात कोणतीही आर्थिक लूट सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिले आहेत. शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत येणाऱ्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया आणि औषधे रुग्णांना पूर्णतः मोफत देणे बंधनकारक असून कोणत्याही कारणास्तव रुग्णांकडून पैशांची मागणी करणे हे कराराचे उल्लंघन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. लहाडे यांनी स्पष्ट केले की, एखाद्या रुग्णालयाने ‘पॅकेज कमी आहे’ असे कारण देत रुग्णांकडून पैसे मागितल्यास संबंधित डॉक्टर व रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध त्याच दिवशी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांची योजनेतील नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे केली जाणार आहे.
दरम्यान, बायपास सर्जरी, कॅन्सर उपचार यांसारख्या मोठ्या शस्त्रक्रियांसाठी आता ५ ते ६ लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच उपलब्ध असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

रुग्णांना आवाहन :

जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे या योजनांसाठी स्वतंत्र ‘आरोग्य मित्र’ कक्ष कार्यरत आहे. पात्र रुग्णांना योजनांचा लाभ नाकारला गेला किंवा पैशांची मागणी करण्यात आली तर त्यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, गडचिरोली येथे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here