देसाईगंज : रेती माफियांना अभय देणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘हंटर’, मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित – तहसीलदारांवरही कारवाईचा बडगा
– कोंढाळा-सिंड्राई घाटातील जीवघेण्या अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील कोंढाळा-सिंड्राई घाटावर अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने महसूल विभागावर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अवैध रेती उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, देसाईगंजच्या तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
कोंढाळा-सिंड्राई घाट परिसरात वैणगंगा नदीपात्रातून अवैध रेतीची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन विलास महादेव देवढकले (वय ३६, रा. कोंढाळा, ता. देसाईगंज) यांचा मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तातडीने दखल घेत जिल्हा भरारी पथक नेमून सखोल चौकशीचे आदेश दिले होते.
भरारी पथकाच्या स्थळ पाहणी अहवालासह उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांनी सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या. संबंधित रेतीघाटावरील उत्खनन १० जून २०२६ पासून बंद करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही तेथे अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक महसूल यंत्रणेकडून अपेक्षित दक्षता घेण्यात आली नसल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.
या निष्कर्षांच्या आधारे संबंधित क्षेत्रातील मंडळ अधिकारी अर्चना टिस्कुले आणि तलाठी महादास ठाकरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. तसेच या प्रकरणातील प्रशासकीय जबाबदारी निश्चित करत देसाईगंजच्या तहसीलदार प्रिती डुढलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रकारांना अभय देणारे किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील सर्व महसूल व संबंधित यंत्रणांनी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, अवैध रेती उत्खननाविरोधात प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #IllegalSandMining #SandMafia #RevenueDepartment #DistrictAdministration #CollectorAction #AdministrativeAction #Suspension #Maharashtra #Desaiganj #LawEnforcement #BreakingNews #LatestNews #GoodGovernance #AntiCorruption #PublicInterest #MiningMafia #Governance #NewsUpdate #MarathiNews













