लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या प्रियांका ओक्साची बीएसएफमध्ये दमदार निवड
– गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या एका उल्लेखनीय यशात भामरागड येथील गुणवंत खेळाडू कु. प्रियांका लालसू ओक्सा हिची सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये क्रीडा कोटा-२०२५ अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी निवड झाली आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीमध्ये घेतलेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाच्या बळावर तिने हे यश संपादन करत गडचिरोली जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
दुर्गम आदिवासी भागातील प्रियांकाने अथक मेहनत, शिस्त, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. तिच्या क्रीडा प्रवासात लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीने प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रायोजकत्वाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण साथ दिली. परिणामी, तिची बीएसएफमध्ये झालेली निवड ही केवळ वैयक्तिक यश नसून ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
प्रियांकाने विविध स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. क्रीडेच्या माध्यमातून शासकीय सेवेत करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी तिचा प्रवास प्रेरणादायी मानला जात आहे.
या यशाबद्दल अभिनंदन करताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, “प्रियांकाचे यश आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. तिची मेहनत, शिस्त आणि समर्पण यामुळेच तिला हे यश मिळाले आहे. तिचा प्रवास गडचिरोलीतील अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता मिळविण्यासाठी आणि राष्ट्रसेवेत योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल. ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला संधी देऊन युवकांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी लॉयड्स मेटल्स कायम कटिबद्ध राहील.
लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीने प्रियांका ओक्साचे मनःपूर्वक अभिनंदन करत देशसेवेतील तिच्या उज्ज्वल आणि यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियांका ओक्साचे हे यश तळागाळातील क्रीडा विकासासाठी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे फलित असून, योग्य प्रशिक्षण, संधी आणि जिद्द यांच्या बळावर ग्रामीण भागातील युवक-युवतीही राष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.













