देसाईगंज : अवैध रेती उपशाने घेतला मजुराचा ‘बळी’

81

देसाईगंज : अवैध रेती उपशाने घेतला मजुराचा ‘बळी’
– मुदत संपलेल्या सिंड्राई रेतीघाटावर यंत्राखाली चिरडून मृत्यू, पुरावे दडपण्याचा प्रयत्न?
The गडविश्व
गडचिरोली, दि.२६ : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील सिंड्राई रेतीघाटावर कथितपणे सुरू असलेल्या अवैध रेती उपशादरम्यान एका मजुराचा यंत्राखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२५ जून) सकाळी घडली. या घटनेमुळे अवैध रेती उत्खनन, वाळूमाफियांची मनमानी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत मजुराचे नाव विलास महादेव देवढगले (वय ३४, रा. जुनी वडसा) असे असून, ते चालकासह मजूर म्हणून रेतीघाटावर काम करत होते. सकाळी मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रेतीचा उपसा सुरू असताना ते अचानक यंत्राखाली दबले. गंभीर जखमी झालेल्या विलास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

अपघात की सत्य दडपण्याचा प्रयत्न?

घटनास्थळी जड यंत्रसामग्री आणि वाहनांच्या हालचालींचे पुरावे आढळल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीला हा प्रकार वाहनातून पडल्याने झालेला अपघात असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, प्रत्यक्ष घटनेची माहिती समोर आल्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे सांगितले जात आहे.

मुदत संपल्यानंतरही रेती उपसा सुरूच कसा?

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे सिंड्राई रेतीघाटावरील परवानगीची मुदत संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा सुरू असल्याचा आरोप होत आहे. घाट बंद असताना जड यंत्रसामग्री तेथे पोहोचली कशी? ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती? महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

उपविभागीय अधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

घटनेची गंभीर दखल घेत देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी तहसीलदारांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मुदत संपल्यानंतरही सिंड्राई रेतीघाटावर रेती उपसा कोणाच्या परवानगीने सुरू होता, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एका मजुराचा बळी गेल्यानंतरही अवैध रेती उपशावर प्रभावी कारवाई होणार का, की हे प्रकरणही चौकशीपुरतेच मर्यादित राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #desaiganj

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here