आश्रम शाळेतील ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू ; व्यवस्थापनावर पालकांचे गंभीर आरोप

189

आश्रम शाळेतील ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू ; व्यवस्थापनावर पालकांचे गंभीर आरोप
The गडविश्व
प्र/ गोंदिया (चेतन गहाणे), दि.०६ : जिल्ह्यातील मालिनीताई सुखदेव दहिवले आदिवासी आश्रम शाळा, एरंडी नवेगाव येथे शिकणाऱ्या इयत्ता पाचवीतील नूतन मडावी (वय ११) या विद्यार्थिनीचा ३ मार्च रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेने मुलीच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती न देता तिला घरी सोडल्याचा आरोप करत पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात गंभीर तक्रार केली असून या प्रकरणामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नूतन मडावी हिला होळीच्या सुट्टीसाठी २६ फेब्रुवारी रोजी तिच्या मूळ गावी परसटोला (ता. अर्जुनी, जि. गोंदिया) येथे शाळेकडून सोडण्यात आले. मात्र मुलीची प्रकृती बरी नसतानाही याबाबत पालकांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. घरी पोहोचल्यानंतर नूतनची प्रकृती अचानक खालावली. सुरुवातीला तिला स्थानिक खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता तिला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना ३ मार्च रोजीच रुग्णवाहिकेत तिचा मृत्यू झाला. आरमोरी येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पालकांचे गंभीर आरोप

नूतनच्या आई-वडिलांनी शाळा व्यवस्थापनावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. ‘मुलीची प्रकृती बरी नाही हे आम्हाला आधी सांगितले असते तर आम्ही वेळेवर उपचार केले असते. शाळेच्या दुर्लक्षामुळे आमची मुलगी गेली,’ असा आक्रोश पालकांनी व्यक्त केला.
दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीचे पार्थिव घरी नेण्यासाठी आरमोरी रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका देण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणी ६ मार्च रोजी पालकांनी केशोरी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दाखल केली आहे. घटनेची चौकशी सुरू असून पोलीस, आदिवासी विकास विभाग आणि शिक्षण विभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

वैद्यकीय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांपासून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी झालेली नाही. नूतनचा मृत्यू सिकलसेल आजारामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र असे असल्यास शाळेतील व्यवस्थापक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब का आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गडचिरोली-गोंदिया परिसरातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि देखभालीबाबत वारंवार तक्रारी समोर येत असल्याने या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. विविध आदिवासी संघटना व स्थानिक राजकीय नेत्यांनी नूतनच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवित या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
आश्रम शाळा ही विद्यार्थ्यांसाठी दुसरे घर असते. तिथे मुलांच्या आरोग्याची जबाबदारी शाळेची असते. एका चिमुकलीचा मृत्यू होईपर्यंत व्यवस्थेला जाग का येत नाही? असा सवाल आता समाजातून उपस्थित केला जात आहे.
नूतन मडावीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gondianews #latestnews #t20wordcup

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here