कढोली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०८ : कुरखेडा तालुक्यातील मौजा कढोली येथे तहसील कार्यालयाच्या वतीने ७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. शासनाच्या विविध योजना व प्रमाणपत्रे थेट वंचित नागरिकांपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बेलगावचे सरपंच दिनकर कुमरे यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार राजकुमार धनबाते होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल अभियान महत्त्वाची भूमिका बजावत आहे.”
कार्यक्रमाला नायब तहसीलदार वैभव आंबेकर, सत्यनारायण अनमदवार, प्रदीप शिंदे, भूमी अभिलेख कार्यालयाचे हुकरे साहेब, कृषी विभागाचे संजय रामटेके, तुकाराम विद्यालयाचे प्राचार्य आहुजा, दुय्यम निबंधक परम उसेंडी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शेळके, पुरवठा निरीक्षक सोनकुसरे, कढोलीचे उपसरपंच किरण आकरे, उराडीचे उपसरपंच दडमल, तसेच आ.वि. सोसायटीचे सभापती फुकट पाटील गरमळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात नागरिकांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना मंजुरी आदेश, ‘बी’ वर्ग-१ मंजुरी आदेश, लक्ष्मीमुक्ती योजना आदेश, नाव दुरुस्ती आदेश तसेच घरकुलधारकांना ५ ब्रास मोफत रेती वाटप आदेश यांसह विविध प्रमाणपत्रे व मंजुरी आदेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. आरोग्य विभागाकडून नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
कार्यक्रमस्थळी विविध विभागांचे स्टॉल लावून नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती व लाभ देण्यात आला. रुक्मिणी प्रधान व बचत गटाच्या महिलांनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचालन ग्राम महसूल अधिकारी प्रवीण नैताम यांनी केले, प्रास्ताविक मंडळ अधिकारी वर्षा किरंगे यांनी मांडले, तर आभार ग्राम महसूल अधिकारी प्रशांत मेश्राम यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विपुल जगदाळे, सृष्टी सडमेक, बाबलू महाका, दामू नाकाडे, यादव दडमल तसेच कढोली मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.













