कोरचीत शिक्षकांच्या पगारातून १०% कपात ; पावत्या गायब
– अनेक महिन्यांपासून रक्कम कपात सुरू, शिक्षकांमध्ये नाराजी, चौकशीची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ०६ : तालुक्यातील काही शाळांमधील शिक्षकांच्या पगारातून दरमहा १० टक्के एनपीएस (NPS) संबंधित रक्कम कपात केली जात असल्याचा प्रकार समोर आला असून, अनेक महिन्यांपासून ही कपात सुरू असतानाही संबंधित शिक्षकांना कोणतीही अधिकृत पावती देण्यात आलेली नसल्याने शिक्षक व कर्मचारी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही शाळांमधील शिक्षकांच्या पगारातून नियमितपणे १० टक्के रक्कम कपात केली जात आहे. मात्र ही रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी व कोणत्या खात्यात जमा केली जाते, याबाबत शिक्षकांना स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय या कपातीसंदर्भातील अधिकृत पावत्या किंवा लेखी नोंदीही अद्यापपर्यंत शिक्षकांना देण्यात आल्या नसल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पगारातून कोणतीही रक्कम कपात केल्यास त्याबाबत अधिकृत पावती व लेखी माहिती देणे बंधनकारक असते. मात्र अनेक वेळा प्रशासनाकडे विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कपात झालेल्या रकमेचा हिशोब नेमका कुठे जमा केला जात आहे, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून कपात झालेल्या रकमेचा स्पष्ट हिशोब द्यावा तसेच संबंधित सर्व शिक्षकांना तात्काळ अधिकृत पावत्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. भविष्यात पावत्यांशिवाय पगारातून कोणतीही रक्कम कपात होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही शिक्षक व कर्मचारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकाराकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchi













