लॉकडाऊनमधील कोठडी मृत्यू प्रकरणी ९ पोलिसांना न्यायालयाकडून फाशीची शिक्षा
The गडविश्व
मदुराई (तामिळनाडू), दि. ०७ : देशाला हादरवून सोडणाऱ्या साथनकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक आणि कठोर निर्णय देत नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊन काळात वडील आणि मुलावर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणात हा निकाल लागल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.
2020 मध्ये कोविड-19 लॉकडाऊनदरम्यान तुतीकोडी जिल्ह्यातील साथनकुलम येथे पी. जयराज (51) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (31) यांना नियमभंगाच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. मात्र, हा आरोप नंतर खोटा ठरला. पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशीच्या नावाखाली रात्रभर निर्घृण मारहाण केल्याचा आरोप होता. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दोघांचा काही दिवसांत मृत्यू झाला.
या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांविरोधात विविध स्तरांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सुरुवातीला राज्य सीआयडीकडे असलेला तपास मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज हटवण्यात आले होते. मात्र, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची साक्ष आणि घटनास्थळी आढळलेले रक्ताचे डाग हे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे ठरले.
सहा वर्षांच्या सुनावणीनंतर मार्च 2026 मध्ये न्यायालयाने सर्व नऊ पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्यानंतर 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल दर्जाच्या नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने हा प्रकार अत्यंत गंभीर पोलीस अत्याचाराचे उदाहरण असल्याचे नमूद करत “कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्यास न्यायव्यवस्था कठोर कारवाई करेल” असे स्पष्ट केले.
या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत असून मानवाधिकार संघटनांनी याला ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय असे संबोधले आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलीस कोठडीतील सुरक्षितता आणि जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














