विद्यार्थी कौशल्य आधारित प्रशिक्षणातून जिल्ह्याच्या विकासात हातभार : मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह

1869

The गडविश्व
गडचिरोली, दि.१५ : गोंडवाना विद्यापीठ व जिल्हा प्रशासन, गडचिरोलीच्या वतीने महत्त्वपूर्ण व नाविण्यपुर्ण उपक्रम विद्यापीठातंर्गत राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षण व कौशल्याधारित प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. अल्फा अकॅडमी व सी.आय.आय.आय.टी (CIIIT) प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच येथील विद्यार्थी कौशल्य आधारित प्रशिक्षणातून जिल्ह्याच्या विकासात हातभार लावेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी व्यक्त केला.
गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने अल्फा अकॅडमीमधील पहिल्या सत्रातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम तसेच सेंटर फॉर इनव्हेंशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग या संकल्प प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन समारोहाप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी, गाेंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत मोहिते, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सह आयुक्त योगेंद्र शेंडे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, अल्फा अकॅडमीचे नोडल अधिकारी डॉ. कृष्णा कारू आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह म्हणाल्या, तत्कालीन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिले व आज पहिली बॅच पूर्ण होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. डिजिटल क्षेत्रात विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधी चालून येतील. नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम जिल्ह्यात राबविल्याबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे अभिनंदन केले. यापुढेही असे उपक्रम विद्यापीठाने राबवावे. प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह म्हणाल्या.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेला, दुर्गम व आदिवासी बहुल जिल्हा अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण देणे या विद्यापीठाचे ध्येय, उद्दिष्ट आणि कर्तव्य आहे. अल्फा अकॅडमीची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने तत्कालीन जिल्हाधिकारी संजय मीना व कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून झाली. विद्यापीठांतर्गत सी.आय.आय.आय.टी(CIIIT) केंद्राच्या माध्यमातून 1 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे तर अल्फा अकॅडमीच्या माध्यमातून 500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून कोडींगचा लाभ येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना होत आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील म्हणाले, गडचिरोली जिल्हा विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर येत आहे. कौशल्य असलेले तज्ञ कामगार व अधिकारी असतील तर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल. येथील विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई पुणे यासारख्या शहरात जावे लागत होते. मात्र, अल्फा अकॅडमी आणि सी.आय.आय.आय.टी (CIIIT) केंद्राच्या माध्यमातून येथील तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण जिल्ह्यातच मिळत आहे. येथील तरुणांना इतर जिल्ह्यातही रोजगार प्राप्त होण्यास मदत मिळेल असे ते म्हणाले.
प्रस्ताविकेत बोलतांना अल्फा अकॅडमीचे नोडल अधिकारी डॉ. कृष्णा कारू म्हणाले, मागील सहा महिन्यापासून हा प्रकल्प कार्यान्वित आहे. आतापर्यंत 500 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तालुकास्तरावर 12 विद्यार्थ्यांची जिल्हा प्रशासनाकडून निवड करण्यात आली आहे.
तत्पूर्वी इंटरनॅशनल सॉफ्ट स्किल ट्रेनर रवींद्र मिसाळ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास तसेच जीवनात यशस्वी होण्याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

पहिल्या सत्रातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण

नवनाथ कन्नाके, संजना वाडणवार, रोहित कुमरे, अंजुम शेख, मयूर कोरवते, वैष्णवी शिलार, आयुषी मस्के, रुपेश वासेकर, गौतमी सहारे, दीक्षा रायपुरे या प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here