जिवंत विद्युत तारेचा स्पर्श ; बैलाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
– विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप, बाधित शेतकऱ्याला तातडीने भरपाई देण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ६ : तालुक्यातील मुरुमगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बेलगाव येथील जंगल परिसरात ११ केव्ही विद्युत वाहिनीची जिवंत तार अचानक तुटून जमिनीवर पडल्याने दोन बैलांना जोरदार विद्युत धक्का बसला. या दुर्घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा बैल गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्युत विभागाच्या निष्काळजी कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
मृत व जखमी झालेले दोन्ही बैल बेलगाव येथील शेतकरी मिलूराम चरनसिंग मलिया यांच्या मालकीचे असल्याचे समजते. जखमी बैलाला उपचारासाठी घरी नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच बेलगावचे पोलीस पाटील संतोष मलिया यांनी पशुवैद्यकीय अधिकारी, मुरुमगाव पोलीस स्टेशन तसेच विद्युत विभागाला तातडीने घटनेची माहिती दिली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुरुमगाव परिसरातील ११ केव्ही विद्युत वाहिनी तब्बल तीन दशकांहून अधिक जुनी असून तिच्या तारा गंजलेल्या व अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. या जुनाट तारा बदलण्याबाबत वारंवार सूचना व मागणी करूनही विद्युत विभागाने आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जीर्ण विद्युत वाहिनीच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी बैल हे शेतीचे महत्त्वाचे साधन असते. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे शेतकरी मिलूराम मलिया यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे.
मृत बैलाची योग्य भरपाई तसेच गंभीर जखमी बैलाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मुरुमगाव विद्युत विभागाने तातडीने द्यावा, अशी मागणी बाधित शेतकरी, पोलीस पाटील संतोष मलिया आणि बेलगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी परिसरातील जीर्ण व धोकादायक विद्युत तारा तात्काळ बदलण्यात याव्यात, अशीही जोरदार मागणी करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews













