गडचिरोली : उद्घाटनानंतर अवघ्या तीन वर्षांतच कोठी–कोरनार पूल खचला, १७ गावांचा संपर्क धोक्यात
– मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन ; निकृष्ट बांधकामाचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. ५ : एटापल्ली तालुक्यातील महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेला जोडणारा आणि परिसरातील १७ गावांसाठी जीवनवाहिनी ठरलेला कोठी–कोरनार येथील वीर बाबुराव शेडमाके पूल उद्घाटनानंतर अवघ्या तीन वर्षांतच खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले होते. तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पुलाच्या संरचनेला तडे जाऊन काही भाग खचल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हा पूल महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या १७ गावांसाठी महत्त्वाचा संपर्कदुवा मानला जात होता. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांना वर्षभर सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि जीवनावश्यक सेवांचा मार्ग सुकर व्हावा, या उद्देशाने शासनाने सुमारे ४.१० कोटी रुपये खर्चून या पुलाची उभारणी केली होती. मात्र, अवघ्या काही वर्षांतच पूल खचल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आजाद समाज पार्टीने बांधकामातील निकृष्ट दर्जाचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व अभियंत्यांना तात्काळ निलंबित करावे, संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करावा, तसेच ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे संरचनेला धक्का?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूल सॉलिड स्लॅब राफ्ट फाउंडेशन सबमर्सिबल ब्रिज प्रकारातील असून त्याची लांबी १०५ मीटर (१५ स्पॅन) आणि रुंदी ७.५० मीटर आहे. २९ ते ३१ जुलै २०२६ दरम्यान एटापल्ली परिसरात २०० ते २१० मिमी अतिवृष्टी झाल्याने नदीला मोठा पूर आला होता. त्या काळात पुलावरून तब्बल २ ते २.५ मीटर उंचीने पाणी वाहत होते.
तांत्रिक पाहणीत १५ स्पॅनपैकी १ स्पॅन नदीपात्रात खचलेला, २ स्पॅन नुकसानग्रस्त, ३ स्पॅनमध्ये संरचनात्मक हालचाल, तर उर्वरित स्पॅन सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक निरीक्षणानुसार नदीकाठाची धूप आणि पाया परिसरातील पोकळीमुळे पुलाच्या संरचनेचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर तपास केला जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : दोषींवर कठोर कारवाई
या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात येणार असून जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे. चौकशी अहवालानुसार आवश्यक असल्यास पुलाची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्यात येईल. दरम्यान, सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #Gadchiroli #BridgeCollapse #KothiKornarBridge #Infrastructure #Maharashtra #DevendraFadnavis #PublicWorks #RoadSafety #ConstructionQuality #BreakingNews #TheGadVishwa #Etapalli #ChhattisgarhBorder #BridgeFailure #MaharashtraNews













