मशरूम आणण्यासाठी जंगलात गेला अन् परतलाच नाही; वाघाच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू

193

मशरूम आणण्यासाठी जंगलात गेला अन् परतलाच नाही; वाघाच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : मशरूम आणण्यासाठी जंगलात गेलेल्या ४५ वर्षीय मजुराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोली तालुक्यातील वसा गावाजवळील जंगल परिसरात गुरुवारी (२४ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. बाळू विठ्ठल राऊत (वय ४५, रा. वसा) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे वसा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळू राऊत हे बुधवारी (२३ सप्टेंबर) सकाळच्या सुमारास मशरूम आणण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, गुरुवारी सकाळी वसा गावाजवळील जंगलात बाळू राऊत यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी विदारक परिस्थिती दिसून आली. या परिसरात वाघाचा वावर असल्याने राऊत यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.
बाळू राऊत यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण वसा गावावर शोककळा पसरली आहे. जंगल परिसरातील वाघाच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.
#thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #TigerAttack #TigerAttackNews #GadchiroliNews #Vasa #TigerNews #Wildlife #HumanWildlifeConflict #TigerEncounter #MaharashtraNews #BreakingNews #LatestNews #GadchiroliDistrict #ForestNews #ViralNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here