कुरखेडा येथे आदिवासी संस्कृतीचा जागर; जागतिक मूलनिवासी दिन उत्साहात साजरा
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. १० : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, कुरखेडा तालुका शाखा तसेच आदिवासी ४५ पोटजमातींच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी जागतिक मूलनिवासी (आदिवासी) दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुकास्तरावर विविध कार्यक्रमांसह भव्य मिरवणूक काढून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात देशमाता देवस्थान येथे आदिवासी देवदेवतांची विधिवत पूजा करून करण्यात आली. यावेळी ४५ पोटजमातींचे तालुकाध्यक्ष तीमेश्वर कोरेटी यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर किसान मंगल कार्यालयातून दुपारी १२ वाजता कुरखेडा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आंबेडकर चौकात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे तालुकाध्यक्ष संजय कोकोडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.
मिरवणुकीत तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात विविध घोषवाक्यांचे फलक घेतले होते. आदिवासी संस्कृतीवर आधारित गीते, पारंपरिक वाद्ये आणि नृत्याच्या सादरीकरणातून समृद्ध आदिवासी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले.
मिरवणुकीनंतर किसान मंगल कार्यालयात मुख्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तीमेश्वर कोरेटी होते. माजी नायब तहसीलदार अंताराम मडावी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, प्रा. दिलीप कुमरे, प्रा. डॉ. मेघराज कपूर आणि शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र कोकुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आमदार रामदास मसराम यांनीही कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त आदिवासी कर्मचारी, उच्चशिक्षित व्यक्ती तसेच इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विधवा मातांना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण सोयाम यांनी केले, तर गुलाब सोनकुकरा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या कुरखेडा तालुका शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.













