सर्पदंशग्रस्त विद्यार्थिनीच्या मदतीला धावले गडचिरोली पोलीस ; हेलिकॉप्टरने नागपुरात केले वैद्यकीय स्थलांतर
– जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेत तिघींचा मृत्यू; गंभीर विद्यार्थिनीला तातडीने नागपूरला हलविले
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गंभीर प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीच्या मदतीला गडचिरोली पोलीस दल धावून आले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या समन्वयातून या विद्यार्थिनीला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूर येथील जी.एम.सी. रुग्णालयात तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले.
जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात १० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना घडली. सर्पदंशानंतर प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थिनींना सुरुवातीला ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित तीन विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिच्यावर अत्याधुनिक वैद्यकीय उपचार तातडीने उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस दलाने संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला.
त्यानंतर गंभीर विद्यार्थिनीला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूर येथील जी.एम.सी. रुग्णालयात वैद्यकीय स्थलांतर करण्यात आले. नागपूर येथील सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या रुग्णालयात तिच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. विद्यार्थिनीच्या उपचारात कोणताही विलंब होऊ नये, यासाठी आरोग्य विभागासह संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन व पोलीस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सर्पदंश झाल्यास कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल व्हावे आणि वेळेत वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.













