कोटगुल येथे कर्करोग तपासणी शिबिर ; ८२ नागरिकांची मोफत तपासणी
The गडविश्व
ता. प्र/कोरची, दि. ०२ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष कर्करोग तपासणी मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल, ता. कोरची येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील एकूण ८२ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेची अंमलबजावणी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनिष मेश्राम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा सल्लागार डॉ. प्रेरणा राऊत, डॉ. आशिष विटणकर (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय कोरची) व डॉ. विनोद मडावी (तालुका आरोग्य अधिकारी, कोरची) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
कर्करोग तपासणी व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग या प्रमुख आजारांची तपासणी करण्यात आली. मुख कर्करोगाच्या ६३ तपासण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १ रुग्ण संशयित आढळला. स्तन कर्करोगाच्या १९ तपासण्या करण्यात आल्या असून कोणताही संशयित रुग्ण आढळला नाही. तसेच गर्भाशय मुख कर्करोगासाठी VIA पद्धतीने १७ तपासण्या करण्यात आल्या.
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून नागरिकांना सखोल समुपदेशन देण्यात आले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, कर्करोगाची प्राथमिक लक्षणे तसेच आजार लवकर ओळखल्यास उपचार कसे सुलभ होतात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या शिबिरात मुख कर्करोगाची तपासणी डॉ. मारगिया यांनी केली, तर स्तन व गर्भाशय मुख कर्करोग (VIA, PAP) तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दुधे यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथील डॉ. स्वप्निल चोरुडे व डॉ. हलमी यांनी सहकार्य केले. रुग्ण समुपदेशनाची जबाबदारी रुपेश भैसारे (NCD समुपदेशक), कु. सीमा पवार (अधिपरिचारिका, NCD) आणि युवराज आत्राम (दंत सहाय्यक), ग्रामीण रुग्णालय कोरची यांनी पार पाडली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कर्करोगाचा लवकर शोध व वेळेवर उपचार केल्यास मृत्यूदर कमी करता येतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.













