नक्षलवादाला मोठा धक्का : आणखी ५१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

137

नक्षलवादाला मोठा धक्का : आणखी ५१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
– २० जणांवर ६६ लाखांचे बक्षीस, शासनाच्या ‘पुना मार्गेम’ योजनेचा प्रभाव
The गडविश्व
विशेष प्रतिनिधी / बिजापूर ( स्वाधिनता), दि. ३० : छत्तीसगड राज्यातील नक्षलवादी चळवळीला आज मोठा हादरा बसला आहे. बिजापूर जिल्ह्यात तब्बल ५१ माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतीचा मार्ग स्वीकारत आत्मसमर्पण केले. या घटनेला राज्य आणि केंद्र सरकारच्या नक्षलविरोधी धोरणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये ९ महिला आणि ४२ पुरुष माओवादी असून, त्यापैकी २० जणांवर एकूण ६६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. हे सर्वजण पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) बटालियन क्रमांक १, एरिया कमिटी, प्लाटून आणि मिलिशिया पातळीवर सक्रिय होते.
हे आत्मसमर्पण ‘पुना मार्गेम: पुनर्वसन ते पुनरुज्जीवन’ (Punarvas se Punarjivan) या छत्तीसगड शासनाच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत झाले असून या योजनेचा उद्देश म्हणजे माओवादी विचारसरणीपासून दूर गेलेल्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे हा आहे.
आत्मसमर्पित माओवादींनी भारतीय संविधानावर विश्वास व्यक्त करत लोकशाही व्यवस्थेत नवे जीवन सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. शासनाच्या धोरणानुसार, प्रत्येक आत्मसमर्पणकर्त्याला ५०,००० रुपयांची पुनर्वसन प्रोत्साहन रक्कम तात्काळ दिली जाणार आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बिजापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण वाढत असून, २०२४ पासून आतापर्यंत तब्बल ६५० माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, तर १९६ नक्षलवादी चकमकींमध्ये ठार आणि ९८६ जणांना अटक करण्यात आली आहे.
बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. जितेंद्र कुमार यादव यांनी शरण आलेल्यांचे स्वागत करत उर्वरित नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, संवाद, पुनर्वसन आणि विकासाचाच मार्ग प्रदेशात स्थायी शांतता आणि प्रगती आणू शकतो.
या सामूहिक आत्मसमर्पणामुळे छत्तीसगडमधील नक्षलवादी चळवळीला जबर धक्का बसला असून, शासनाच्या शांतता व विकासोन्मुख प्रयत्नांना नवे बळ मिळाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Bijapur #Naxalism #MaoistSurrender #ChhattisgarhPolice #PunaMargem #AntiNaxalOperation #PeaceAndDevelopment #TheGadVishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here