दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकली, युवकांना स्वयंरोजगाराचे बळ ; जागतिक आदिवासी दिनी गडचिरोली पोलिसांचा उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते ९० शालेय विद्यार्थ्यांना सायकली, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० युवक-युवतींना टू-व्हिलर रिपेअरिंग व फास्टफूड व्यवसायासाठी किट तसेच तीन बचत गटांना वाद्य साहित्य संचाचे वितरण करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाची संस्कृती, भाषा, कला आणि साहित्याचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला ३०० हून अधिक विद्यार्थी, युवक-युवती व नागरिकांची उपस्थिती होती.
अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ९० विद्यार्थ्यांना सायकलींचे, तर इतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेन, कंपास आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. याशिवाय गडचिरोली पोलीस दल व बिओआय आरसेटी, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून युवक-युवतींना ३० दिवसांचे टू-व्हिलर रिपेअरिंग आणि १२ दिवसांचे फास्टफूड व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक किटचे वाटप करण्यात आले. तीन बचत गटांनाही वाद्य साहित्य संच देण्यात आला.
‘शिक्षणावर लक्ष केंद्रित करा, प्रशिक्षणातून आत्मनिर्भर व्हा’
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक एम. रमेश म्हणाले की, पोलीस आणि नागरिकांच्या समन्वयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता संपुष्टात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करून मेहनत घ्यावी. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींनी उपलब्ध साहित्याचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
१६ हजारांहून अधिक युवकांना रोजगार-स्वयंरोजगार प्रशिक्षण
गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यावसायिक व कौशल्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी ‘पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास, क्रीडा आणि संस्कृती आदी क्षेत्रांत विविध उपक्रम राबविले जात आहेत. आतापर्यंत १६,७०८ युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ७३७ शेतकऱ्यांना कृषी सहलींचा लाभ, १,५४२ नागरिकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ७५ सार्वजनिक वाचनालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय ४,७९६ विद्यार्थ्यांना स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, सुरक्षा रक्षक आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आदी विविध प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १४ लाख ९ हजार ५३२ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदारांनी परिश्रम घेतले.













