गडचिरोलीत ‘चरखे के पास चर्चा’ला सुरुवात ; जनतेच्या प्रश्नांवर थेट लोकसंवाद
– महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वातील उपक्रमाचे आमदार अभिजीत वंजारी यांच्या हस्ते उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ९ : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात ‘चरखे के पास चर्चा’ या लोकसंवाद उपक्रमाला रविवारपासून सुरुवात झाली. राजीव गांधी सभागृह, गडचिरोली येथे आमदार अभिजीत वंजारी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दि. ९ ते १५ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील विविध भागांत हा लोकसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
देशात व समाजात वाढत चाललेला द्वेष, अत्याचार आणि हिंसक प्रवृत्ती, तसेच शासनाच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी वर्गासमोर निर्माण झालेल्या अडचणींवर उद्घाटनप्रसंगी सविस्तर चर्चा करण्यात आली. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि लोकशाहीच्या विचारांचा वारसा पुढे नेत जनतेच्या प्रश्नांवर विचारमंथन करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील दिशा निश्चित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. ‘चरखे के पास चर्चा’च्या माध्यमातून नागरिक, शेतकरी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
पुढील सात दिवसांत शेतजमिनींचे प्रश्न, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला व युवकांचे प्रश्न तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तालुकानिहाय आणि भागनिहाय चर्चा करण्यात येणार आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि लोकशाहीच्या मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे, दिवाकर निसार, प्रभाकर वासेकर, नगरसेवक तथा काँग्रेस शहराध्यक्ष सतीश विधाते, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, नगरसेविका मेघाताई वरगंटीवार, नगरसेविका मनीषाताई खेवले, माजी जि.प. सदस्य कविताताई भगत, पुष्पलताताई कुमरे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गवतुरे, शंकरराव सालोटकर, अनिल कोठारे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर यांच्यासह गजानन नैताम, ढिवरू मेश्राम, हरबाजी मोरे, अनिल कोठारे, उत्तम ठाकरे, पांडुरंग घोटेकर, दत्तात्रय खरवडे, रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, रोडे महाराज, विजय लाड, जितेंद्र मुनघाटे, विपुल येलटीवार, गौरव येनप्रेड्डीवार, संजय मेश्राम, महादेव भोयर, रीताताई गोवर्धन, कविताताई उराडे, सुधीर बांबोळे, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













