धक्कादायक! जपतलई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
– मध्यरात्री गाढ झोपेत असताना विषारी सापाने घेतला चावा, आश्रमशाळेतील सुरक्षाव्यवस्थेचा फज्जा, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत मध्यरात्री सर्पदंशाच्या भीषण घटनेत तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि.०९) मध्यरात्री सुमारे १.३० वाजता सर्व विद्यार्थी गाढ झोपेत असताना विषारी सापाने विद्यार्थिनींना चावा घेतल्याची ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दीपिका एकनाथ लाकळा (वय १२, रा. जेव्हेली, ता. एटापल्ली) आणि सुश्मिता सरोजित मंडल (वय १४, रा. मेंढरी, ता. एटापल्ली) या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.
दरम्यान, उर्वरित तीन विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात येत होते. मात्र गडचिरोलीकडे नेत असतानाच अंनु गजुराम कोरेटी (वय ७, रा. केहकावाई, ता. धानोरा) या चिमुकलीचाही वाटेत मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील मृत विद्यार्थिनींची संख्या तीनवर पोहोचली आहे.
सध्या उर्वरित दोन विद्यार्थिनींवर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. समृद्धी सुरेश नैताम (वय १४, रा. रांगी, ता. धानोरा) हिची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे. तर दीपिका बिटकूराम मडावी (वय १२) हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
२०० विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत सुरक्षेचा फज्जा?
सुमारे २०० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह मूलभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आश्रमशाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी कॉट अथवा बेडची कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे लहान-लहान विद्यार्थ्यांना उघड्या जमिनीवरच बिछाना टाकून झोपावे लागत असल्याचे समोर आले आहे.
“विद्यार्थ्यांसाठी वेळेवर कॉटची व्यवस्था केली असती, तर कदाचित या निष्पाप मुलींचे प्राण वाचले असते,” अशा संतप्त भावना पालक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या घटनेनंतर आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आश्रमशाळेच्या सुरक्षाव्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी
या धक्कादायक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत संबंधित संस्था व जबाबदार व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक तसेच नागपूर येथील पथके घटनास्थळी दाखल होऊन आश्रमशाळेची पाहणी करणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, सर्पदंशापासून बचावासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, परिसरातील संभाव्य सर्पप्रवेशाची कारणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन करण्यात आले होते का, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
चौकशीत निष्काळजीपणा अथवा सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उपचाराधीन विद्यार्थिनींना तातडीने अँटी व्हेनम
सर्पदंशाच्या घटनेनंतर उपचाराधीन विद्यार्थिनींना तातडीने सर्पदंश प्रतिबंधक औषध (अँटी व्हेनम) देण्यात आले आहे. औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, तसेच विद्यार्थिनींची विशेष काळजी घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून शोक व्यक्त
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी या हृदयद्रावक घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. उपचाराधीन विद्यार्थिनींना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार आणि सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने जपतलई आश्रमशाळेतील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नाशिक व नागपूर येथील पथकांच्या चौकशीतून नेमकी कोणाची चूक आणि कुठे निष्काळजीपणा झाला, हे स्पष्ट होणार आहे. चौकशी अहवालानंतर संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.













