गडचिरोली : फटाका विक्रेत्यांना दिलासा; तात्पुरते परवाने आता तालुकास्तरावरच मिळणार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्रीचा परवाना घेऊ इच्छिणाऱ्या विक्रेत्यांना जिल्हा प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता फटाका विक्रीचा तात्पुरता परवाना मिळवण्यासाठी अर्जदारांना जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. हे परवाने आता तालुकास्तरावरच उपलब्ध होणार आहेत.
अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी तात्पुरते फटाका विक्री परवाने निर्गमित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
दिवाळीच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तात्पुरते फटाका विक्री स्टॉल उभारले जातात. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विक्रेत्यांना यापूर्वी परवान्यासाठी गडचिरोली येथे यावे लागत होते. प्रशासनाच्या नव्या निर्णयामुळे ही धावपळ आता कमी होणार असून, विक्रेत्यांना आपल्या तालुक्यातूनच परवान्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
फटाका विक्रीचा तात्पुरता परवाना घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी आपल्या संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून रीतसर अर्ज व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.













