भामरागड : मरकणार येथील ग्रामस्थांनी केली माओवाद्यांना गावबंदी
– शस्त्रही केले सुपूर्द
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : गडचिरोली जिल्ह्यात माओवादीविरोधातील लोकचळवळ अधिक बळकट होत असून भामरागड तालुक्यातील पोस्टे कोठी हद्दीतील मरकणार येथील ग्रामस्थांनी काल झालेल्या ग्रामसभेत माओवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला. यावेळी ग्रामस्थांनी आपला ठाम निर्धार अधोरेखित करत एक भरमार बंदूकही पोलीसांना सुपूर्द केली.
2003 पासून शासनामार्फत सुरू असलेल्या नक्षल गावबंदी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली पोलिसांनी पोलीस दादालोरा खिडकीसह विविध शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचविला. त्यामुळे नागरिकांचा पोलीस दलावर विश्वास अधिक दृढ झाला असून माओवाद्यांचा खरा चेहरा लोकांसमोर उघड झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या दोन वर्षांत भामरागड उपविभागातील एकूण 40 गावांनी माओवादी संघटनेला गावबंदीचा ठराव संमत करून विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
मरकणार गाव अबुझमाड जंगल क्षेत्रालगत असल्याने भूतकाळात येथे माओवादींचे वर्चस्व होते. मात्र, आता ग्रामस्थांनी शासन व पोलिसांवर विश्वास दाखवत माओवादींच्या दबावाला झुगारून विकासाचा मार्ग निवडला आहे. दिनांक 30 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत 70 ते 75 ग्रामस्थ उपस्थित राहून त्यांनी एकमताने माओवाद्यांना गावातून हद्दपार करण्याचा ठराव अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक यांच्याकडे सादर केला.
या प्रसंगी कार्तिक यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनी देखील माओवाद्यांना कोणतीही मदत न करण्याचे व त्यांच्या दबावाला बळी न पडण्याचे आश्वासन दिले.
ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते, प्रभारी अधिकारी पोस्टे कोठी पो.उ.नि. दिलीप गवळी आणि त्यांच्या पथकाने यामध्ये सक्रिय भूमिका बजावली. या ठरावाचे स्वागत करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तसेच अबुझमाड परिसरातील इतर गावांनीही माओवादींच्या दहशतीला बळी न पडता विकासाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














