तब्बल १० हजार ३०९ उमेदवारांना एकाच दिवशी मिळणार शासकीय सेवेत नियुक्ती
– ५१८७ अनुकंपा उमेदवारांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने अनुशेष संपुष्टात
The गडविश्व
मुंबई, दि. ०२ : राज्यातील रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. येत्या ४ ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार असून, त्याच वेळी एमपीएससीतर्फे निवड झालेल्या ५१२२ उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत दाखल होणार आहेत.
शासकीय नोकरीतील कर्मचार्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. मात्र तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे रखडली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संवेदनशील विषयावर लक्ष घालून सातत्याने आढावा घेतला, नवीन धोरण तयार केले आणि शेवटी प्रतिक्षा संपवली.
मुंबईत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण केले जाणार आहे.
या नियुक्त्यांमध्ये कोकण विभागातील ३०७८ उमेदवार, विदर्भातील २५९७, पुणे विभागातील १६७४, नाशिक विभागातील १२५० आणि मराठवाड्यातील १७१० उमेदवार सामील आहेत.
राज्यातील प्रशासकीय सुधारणांच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, अनुकंपा अनुशेष संपुष्टात आणणारा हा उपक्रम हजारो कुटुंबांना नवी आशा देणारा ठरणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













