नेपाळमध्ये गडचिरोलीचे पर्यटक अडकले आहेत का?; प्रशासनाचे तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन
– पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क; आपत्कालीन क्रमांक व ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये गेलेले गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटक अडकले आहेत का, याबाबत प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. अडकलेल्या पर्यटकांनी किंवा त्यांच्याशी संपर्क होत नसलेल्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
पूरस्थितीमुळे नेपाळमध्ये अडकलेले गडचिरोलीतील पर्यटक अथवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्यास संबंधितांची माहिती प्रशासनाला तातडीने उपलब्ध करून द्यावी. यामुळे संबंधित व्यक्तींची माहिती संकलित करून पुढील मदत व समन्वय साधण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.
अडकलेल्या पर्यटकांची माहिती देताना पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा.
या क्रमांकांवर साधा संपर्क
जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष, गडचिरोली :
०७१३२-२२२०३१ / २२२०३५
मोबाईल : ९४२३९११०७७ / ८२७५३७०२०८
पोलीस नियंत्रण कक्ष, गडचिरोली :
०७१३२-२२३१४२
ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे नोंदविण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे. संबंधित पर्यटक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या लिंकवर माहिती नोंदवावी.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.













