रस्ते-पुलांच्या प्रश्नांवर खासदार किरसान आक्रमक; निधीसह निकृष्ट कामांच्या चौकशीची मंत्र्यांकडे मागणी

34

रस्ते-पुलांच्या प्रश्नांवर खासदार किरसान आक्रमक; निधीसह निकृष्ट कामांच्या चौकशीची मंत्र्यांकडे मागणी
– कोठी-कोरणार पूल अवघ्या तीन वर्षांत कोसळल्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषी कंत्राटदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि.२६ : जिल्ह्यातील रस्ते, पूल आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत जिल्ह्यातील विविध समस्यांकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे लक्ष वेधले.

एटापल्ली तालुक्यातील कोठी-कोरणार येथे बांधण्यात आलेला पूल अवघ्या तीन वर्षांत कोसळल्याचा गंभीर मुद्दा खासदार किरसान यांनी उपस्थित केला. या पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवू नये, तर दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

लोकप्रतिनिधी हे जनतेच्या समस्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकासकामांची शिफारस करीत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या अत्यावश्यक कामांना प्राधान्य देऊन त्यांना तातडीने मंजुरी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही खासदारांनी केली.

कुंभी-चांदाळा तसेच रानमूल-माडेमुल या गावांना जोडणाऱ्या पोटफोडी नदीवरील पूल अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गडचिरोली शहरापासून अवघ्या ८ ते १० किलोमीटर अंतरावर असूनही पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या पुलाच्या कामाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.

मंगेवाडा ते मंगेवाडा टोला, येरमागड येथील मोठ्या नाल्यावर पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पुलाच्या मागणीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांनी पाण्यात उभे राहून आंदोलनही केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन हे काम तातडीने हाती घेण्याची मागणी खासदारांनी केली.

सावंगा ते मंगेवाडा हा छत्तीसगड सीमेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. पावसाळ्यात बांडिया नदीला पूर आल्याने या मार्गावरील संपर्क तुटतो. त्यामुळे या ठिकाणी पुलाचे बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले. तसेच सालेभट्टी ते चिचोली-धानोरा मार्गावरील कठाणी नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना अवघे ५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल २५ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे या ठिकाणीही पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली.

मीचगाव बुजुर्ग ते फासिटोला दरम्यान कठाणी नदीवर पूल उभारून हा मार्ग दूधमाळा राष्ट्रीय महामार्गाला जोडल्यास परिसरातील २० ते २५ गावांना गडचिरोलीशी थेट संपर्क मिळू शकतो. त्यामुळे या पुलाच्या कामालाही प्राधान्य देण्याची मागणी खासदार डॉ. किरसान यांनी केली.

यासोबतच जिल्ह्यातील इतर महत्त्वाचे रस्ते, पूल, पुलिया आणि प्रलंबित विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत ही कामे गतीने पूर्ण करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रलंबित कामांना प्रशासकीय मंजुरी आणि निधी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आमदार रामदास मसराम, आमदार मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here