The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १५ : तालुक्यातील एरंडी येथील गावामध्ये रस्त्याच्या मध्यभागी इलेक्ट्रिकचा लोखंडी खांब उभा असल्याने तो अपघाताला आमंत्रण देणारा असून सदर लोखंडी खांब लवकरात लवकर हटवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
धानोरा तालुक्यात पूर्वीच विद्युत पुरवठा सुरळीत राहात नाही.खंडिंत विद्युत पुरवठ्याची समस्या वारंवार उद्भवत असते आणि अशाच परिस्थितीत एरंडी या गावांमध्ये रस्त्याच्या मध्ये अनेक वर्षापासून इलेक्ट्रिक पोल उभा असल्याने तो इतरांसाठी धोकादायक आहे. एवढे वर्ष होऊन सुद्धा सदर खांबाकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून याचे विपरीत परिणाम मात्र गावकऱ्यांना सोसावे लागत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी असल्याने कोणतेही वाहन त्या लोखंडी बोलला टक्कर देऊ शकते किंवा अंधाराच्या कालावधीमध्ये जाताना येताना एखादा व्यक्ती आपटल्यास अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने वेळीच त्याची दखल घेऊन सदर इलेक्ट्रिक पोल काढून बाजूला लावून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
तसेच गावातील रस्ते सुद्धा पूर्णपणे तुटलेल्या असून गिट्टी वरती निघाली असल्याने अशा वाईट अवस्था असलेल्या रस्त्यावरून गावकऱ्यांना मार्गक्रमण करावा लागत आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा या गावांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पक्की सडक बनलेली नसल्याने गावकरी च्या मनात शासनाविरोधात रोष निर्माण होत आहे.
