गडचिरोलीच्या अंगणवाडी सेविकेला राष्ट्रीय गौरव ; ७७व्या प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीत विशेष आमंत्रण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणारी घटना घडली असून, कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा अंगणवाडी केंद्राच्या सेविका श्रीमती आशा चन्ने यांना ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (२६ जानेवारी २०२६) नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य परेडसाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या सोबत त्यांचे पतीही या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत पोषण ट्रॅकर (Poshan Tracker) अॅपवर केलेल्या उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारे केंद्र सरकारच्या ‘जनभागीदारी’ संकल्पनेतून त्यांची निवड करण्यात आली आहे. मिशन सक्षम अंगणवाडी व पोषण २.० अंतर्गत देशभरातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना हा मान दिला जातो.
यंदा देशभरातून सुमारे १० हजार विशेष पाहुण्यांना (जोडीदारांसह) प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आमंत्रण देण्यात आले असून, त्यात अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, स्ट्रीट व्हेंडर, जल रक्षक, बांधकाम कामगार आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रातून सहा अंगणवाडी सेविका या सन्मानासाठी निवडल्या गेल्या असून, गडचिरोली जिल्ह्यातून दोन सेविकांचा त्यात समावेश आहे.
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही श्रीमती आशा चन्ने यांनी ग्रामीण भागातील बाल पोषण, माता-शिशु आरोग्य व बालविकासासाठी केलेले अथक कार्य आज राष्ट्रीय पातळीवर गौरविले जात आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे मनोबल उंचावले आहे.
बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती राजश्री रहाटे यांच्या मार्गदर्शनाखालील कुरखेडा प्रकल्पातील सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जिल्हा व तालुका स्तरावरून श्रीमती आशा चन्ने यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या राष्ट्रीय आमंत्रणामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून, बाल पोषण व विकास क्षेत्रात नव्या प्रेरणेचा संचार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














