कोरची : भरधाव ट्रक चिखलात अडकला अन् गोतस्करीचा डाव उधळला
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. २१ : तालुक्यातील बेलगाव घाट परिसरातील देवबोडी येथे गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणारा १४ चाकी ट्रक अपघातग्रस्त होऊन चिखलात अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून गोतस्करीचा डाव उधळला गेला. या घटनेत ट्रकमधील पाच जिवंत गोवंशांचे प्राण वाचले असून संबंधित अज्ञात चालकाविरुद्ध कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस मदत केंद्र बेडगाव येथे २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बेलगाव घाटातील देवबोडी परिसरात एक ट्रक अपघात होऊन चिखलात घुसल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी १४ चाकी ट्रक अपघातग्रस्त अवस्थेत देवबोडी येथील चिखलात अडकलेला आढळून आला.
ट्रकची पाहणी केली असता, कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांची दाटीवाटीने कोंबून वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात, ट्रकचा चालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे दिसून आले.
घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गोवंशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षित जोपासनेसाठी ध्यान फाउंडेशन गोशाळा, गराडा (लाखनी) येथील गोशाळेत त्यांना हलविण्यात आले.
या प्रकरणी १४ चाकी ट्रकच्या अज्ञात चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन कोरची (पोमके बेडगाव) येथे कलम २८१ सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम (सुधारित २०१५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर घटनेतील आरोपीचा शोध सुरू असून गोवंश तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #korchi #crimenews
#GoSmuggling #CattleSmuggling #TruckAccident #BelgaonGhat #Deodbodi #GadchiroliPolice #KorchiPolice #AnimalCruelty #Maharashtra #PoliceAction #CattleRescue #IllegalTransport #BreakingNews














