क्रीडांगणावर लॉयड्सचे वर्चस्व ; व्हॉलीबॉल-कबड्डीत जिल्हास्तरीय सरशी
The गडविश्व
चंद्रपूर/गडचिरोली, दि. २१ : ग्रामीण व तळागाळातील क्रीडा प्रतिभेला व्यासपीठ देणाऱ्या लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीने जिल्हास्तरावर आपले वर्चस्व सिद्ध करत व्हॉलीबॉल व ग्रामीण कबड्डी या दोन्ही स्पर्धांत विजेतेपद पटकावले आहे. या दुहेरी यशामुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून लॉयड्सच्या क्रीडा विकास उपक्रमांची प्रभावी फलश्रुती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोवारी येथे आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवले. जिल्ह्यातील १६ संघांच्या सहभागात पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लॉयड्स संघाने प्रतिस्पर्ध्यावर १५–१० असा ठोस विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
याचदरम्यान, पारसलगोंडी येथील लॉयड्स ग्रामीण कबड्डी संघाने आलेंगा येथे झालेल्या जिल्हास्तरीय ग्रामीण कबड्डी स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखले. ४५ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत लॉयड्स संघाने सुरुवातीपासून अंतिम फेरीपर्यंत एकही सामना न गमावता अपराजित विजेतेपद पटकावले.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या क्रीडा उपक्रमांचे हे यशस्वी फलित मानले जात आहे. ग्रामीण भागातील गुणवान युवकांना ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण, क्रीडा सुविधा व स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरले आहे.
या विजयांमुळे खेळाडूंसह स्थानिक नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, ग्रामीण भागातून भविष्यातील दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी नियोजनबद्ध व दीर्घकालीन क्रीडा उपक्रम राबवण्याच्या अकादमीच्या बांधिलकीला नवे बळ मिळाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews














